वाहतूक सुरळीत करण्यासाठी जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोडवरील सर्व अडथळे सात दिवसांत दूर करा

- उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण, राज्यमंत्री रविंद्र वायकर यांचे महापालिका, मेट्रो, वाहतुक शाखा तसेच पोलिसांना निर्देश

- सात दिवसांमध्ये सर्विस रोड सुरू करण्याचेही दिले निर्देश
मुंबई 

जोगेश्‍वरी पूर्व येथील संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्ता (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड) प्रवास अपघात विरहीत होण्याबरोबरच वाहतूक सुरळीत करण्यासाठी सात दिवसांमध्ये या मार्गावरील सर्व अडथळे दूर करा. तसेच येथील सर्विस रोड तात्काळ सुरू करा, असे निर्देश, जोगेश्‍वरी विधानसभेचे आमदार, उच्च व तंंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर मेट्रो, वाहतुक शाखा तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. सात दिवसांमध्ये दिलेल्या निर्देशाचे पालन न झाल्यास शिवसेनेला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे सुतोवाचही त्यांनी अधिकार्‍यांना केले.

संत शिरोमणी गाडगेबाबा महाराज रस्ता (जोगेश्‍वरी विक्रोळी लिंक रोड) वर सध्या मेट्रो-६ चे काम सुरू आहे. यामुळे येथील रस्त्यावर मेट्रोने बेरीकेट टाकले आहेत. त्यामुळे येथील चौपदरी रस्ता दुपदरी झाला आहे. या ठिकाणी दरदिवशी मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडीचा वाहनचालकांना सामना करावा लागत आहे. अशातच या रस्त्यावर पुरेसे वाहतुक कर्मचारी नसल्याने अनेक वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सात दिवसांमध्ये या रस्त्यावर ४ अपघात झाले आहे. काही दिवसांपुर्वीच सायली राणे या मुलीला भरधाव कारने धडक दिल्याने ती गंभिर जखमी झाली. या घटनेची माहिती मिळताच राज्यमंत्री वायकर यंानी तात्काळ रुग्णालयात जाऊन या मुलीच्या तब्येतीची डॉक्टर तसेच तीच्या नातेवाईकांकडे विचारपुस केली. तीच्या उपचारासाठी रविंद्र वायकर तसेच नगरसेवक प्रविण शिंदे यांनी आर्थिक मदतही केली. 

या रस्त्यावर वारंवार घडणार्‍या अपघातांच्या घटना थांबविण्यासाठी राज्यमंत्री वायकर यांनी बुधवारी सकाळी मेट्रो, मुंबई महानगरपालिका, वाहतुक शाखा, एमएमआरडीए, मेघवाडी तसेच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेत पाहणी दौरा केला. या पाहणी दौर्‍यात या रस्त्यावरील सर्विस रोड तात्काळ सुरू केल्यास वाहतुकी कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याने त्यांनी येत्या सात दिवसांमध्ये सर्विस रोड सुरू करावा. यासाठी या सर्विस रोडच्या मार्गावर येणारे सर्व अडथळे सात दिवसांमध्ये दूर झाले पाहिजे, असे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांना दिले. हा सर्विश रोड तयार करण्यासाठी महापालिकेने करोडो रुपयांचे टेंडर काढले आहे, त्याची प्रक्रिया पुर्ण करुन काम सुरू व्हावे, यासाठी वायकर यांनी महापालिका आयुक्त यांच्याशी चर्चाही केली. त्याचप्रमाणे सर्विस रोड सुरू करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, असे निर्देशही त्यांनी मेट्रोच्या अधिकार्‍यांना दिले. या मार्गावरील वाहतुक सुरूळीत  व अपघात विरहित करण्यासाठी वाहतुक पोलिसांनी (जास्त करुन जंक्शन तसेच बेरीकेट) या ठिकाणी वाहतुक पोलिस तैनात करावे, असे निर्देशही त्यांनी वाहतुक शाखेला दिले आहेत. यासाठी गरज भासल्यास मेट्रोची मदत घेऊन अतिरिक्त वाहतुक पोलिस तैनात करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. सगळ्या एजन्सींनी समन्वय साधून काम करुन या रस्त्यावरील वाहतुक सात दिवसांमध्ये सुरूळीत कशी होईल याला प्राधान्य द्यावे. अन्यथा शिवसेनेला नाईलाजाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे सुतोवाचही वायकर यांनी यावेळी केले. या पहाणी दौर्‍यात नगरसेवक बाळा नर, प्रविण शिंदे, शाखाप्रमुख प्रदिप गांधी, उपविभागप्रमुख कैलास पाठक, शाखाप्रमुख मंदार मोरे, युवासेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, मेट्रो, महापालिका, एमएमआरडीए, वाहतुक शाखा, पोलिस अधिकारी उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

QNet launches New Luxury Chairos Watches

गोदरेज एंड बॉयस गोदरेज लॉकिम मोटर्स द्वारा चिकित्सा उपकरण कैलिब्रेशन सेवाओं के साथ भारत के स्वास्थ्य सेवा क्षेत्र की सुरक्षा

एस्टेक लाइफ साइंसेज ने आदि गोदरेज सेंटर फॉर केमिकल रिसर्च एंड डेवलपमेंट लॉन्च किया